Sat Bara Registration जमीन खरेदी केल्यानंतर प्रत्यक्ष सात-बारा उताऱ्यावर नाव येण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात, यापार्श्वभूमीवर नोंदणी विभागाची ‘आय सरिता’ आणि भूमिअभिलेख विभागाची ‘ई- फेरफार’ या दोन संगणकप्रणाली एकमेकांशी जोडण्यात आल्या आहे. त्यामुळे दस्त नोंदविल्यानंतर ऑनलाइन फेरफारवर नोंद घेतली जाणार आहे. या सुविधेमुळे वीस ते पंचवीस दिवसांत सातबारा उताऱ्यावर नाव नोंदविले जाणार आहे.
राज्याचा महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाने एकत्रित येत सातबारा उतारा आणि मिळकत पत्रिकांवर फेरफार नोंदी घेण्याची प्रक्रिया सुटसुटीत व्हावी, या हेतूने हा निर्णय घेतला. सदर प्रणालीचे कामकाज आता अत्यंत फलदायी झाले आहे. Sat Bara Registration
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून दस्त नोंदणीसाठी सध्या ‘आय सरिता’ या संगणक प्रणालीचा वापर केला जातो. या प्रणालीच्या माध्यमातून खरेदी-विक्री, हक्कसोड, बोजा कमी करणे अथवा चढविणे आदी प्रकारांच्या दस्तनोंदणीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जातात. दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात दस्तनोंदणी झाल्यानंतर ऑटो ट्रिगर पद्धतीने जमीन विकणारा आणि खरेदी करणाऱ्याचे नावे,
कुठली जमीन आणि किती क्षेत्र, दस्तामध्ये दर्शविण्यात आलेले जमिनीचे मूल्य आणि हा व्यवहार कधी झाला आदी सर्व प्रकारच्या माहितीचा मजकूर तयार केला जातो. तो मजकूर महसूल विभागाच्या ई-फेरफार या संगणक प्रणालीला पाठविला जातो. त्यानंतर तलाठी यांच्यामार्फत संबंधितांना नोटीस काढली जाते व मंडल अधिकारी यांच्या मंजुरीने नोंद घेतली जाते. त्या नोंदीचा अंमल सातबारा उताऱ्यावर आपोआप घेण्यात येतो.
तीन संगणकप्रणाली संलग्न
आय सरिता, ई-फेरफार आणि शहरी भागासाठीची ई-पीसीआयसी या तीनही संगणकप्रणाली एकमेकांशी संलग्न करून ग्रामीण भागात सात-बारा व शहरी भागातील मिळकत पत्रिका उताऱ्यावरील फेरफार नोंदी घेण्याचे काम या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती भूमिअभिलेख विभागातील सूत्रांनी दिली. Sat Bara Registration